विदर्भातील महत्वाचा जिल्हा अकोला असून सदर जिल्हयात एकूण 7 तालूके आहेत. अकोला जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागात येतो. सदर जिल्हयाची एकूण लोकसंख्या १८,१८,६१७ असून अकोला जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५,४२८ चौ.कि.मी. आहे. अकोला शहराला त्याचे नाव अकोलसिंह नावाच्या राजाच्या नावावरून पडलेले आहे.
जिल्ह्यात १ महानगरपालिका, ५ नगर पालिका, १ नगर पंचायत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय अकोला येथे तर विभागीय मुख्यालय अमरावती येथे आहे. जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा असून हा जिल्हा तापी- पूर्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे.
अकोला हे शहर मोर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. अकोल्यातील राजराजेश्वर, गायगावचा श्री गणेश, वारी भैरवगडचा मारोती, काटेपूर्णाची चंडिकादेवी, पातूरची रेणुका माता ही भाविकांच्या आकर्षणाची मुख्य केंद्रे आहेत
नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचे प्रवेशद्वार आहे. नरनाळा किल्ला व अभयारण्याला भेट देणाऱ्यांची संख्या मागील काही वर्षांत खूप वाढली असून जिल्हा प्रशासनाने दरवर्षी भरणारा 'नरनाळा महोत्सव' सुरू केला आहे. वारी भैरवगड येथून जवळच आहे.ह्याशिवाय बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा अभयारण्य आणि बार्शीटाकळी तालुक्यात चिंचोली ह्या गावापासून 1 किमी अंतरावर रुद्रायणी मातेचे पहाडावर वसलेले 365 पायऱ्या असलेले पुरातन मंदिर आहे व येथील मोठे धरण सुद्धा लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. इथे शासकीय निवासस्थाने व व्यावसायिक हॉटेल्स उपलब्ध आहेत.
मुंबई ते कोलकाता या मध्य रेल्वेमार्गावरील; तसेच अजमेर-पूर्णा या मार्गावरील अकोला हे महत्त्वाचे जंक्शन आहे. हे रेल्वेने मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, नांदेड, इंदूर, जयपूर, कोल्हापूर या शहरांशी थेट जोडलेला आहे.
अकोला ही परिसरातील फार पूर्वीपासून एक मोठी बाजारपेठ आहे. इथे कापसाची, शेती अवजारांची, सोन्याची आणि गुरांची अशा प्रसिद्ध बाजारपेठा आहेत. विदर्भ प्रदेशातील नागपूर पाठोपाठ अकोला ही मोठी बाजारपेठ गणली जाते.
पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ: विद्यापीठात विदर्भातील शेतीजीवनाचा अभ्यास व विविध पिकांवर संशोधन केले जाते. विद्यापीठाने आतापर्यंत अनेकविध प्रकारची वाणे व शेती अवजारे संशोधित केली आहेत.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) - महामंडळाचे मुख्यालय अकोला येथे आहे.या महामंडळाची स्थापना हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत सन १९७१ मध्ये झाली. महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचे बियाणे उपलब्ध करून दिले जाते.
काटेपूर्णा अभयारण्य विदर्भातील अकोला जिल्ह्यात स्थित आहे. हे अकोलाच्या जवळ असून मुख्यतः काटेपूर्णा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात आहे. हे जलाशय मुख्यत्वे पाणथळ पक्ष्यांना आकर्षित करते..
अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर नरनाळा किल्ला पसरलेला आहे. अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो.